11/01/2025
कुत्र्यांच्या प्रत्येक प्रजातीचे वेगळे वैशिष्टय़ असते. त्या वैशिष्टय़ांनुसार श्वानप्रेमी आपल्या घरासाठी श्वानाची खरेदी करतात. कुत्र्यांच्या परदेशी प्रजातींना श्वानप्रेमींची मोठी पसंती आहे. पण तरीही अस्सल भारतीय अशा कारवान हाऊंड या प्रजातीवरील श्वानप्रेमींचे प्रेम अजूनही कायम आहे. शिकार आणि राखण यासाठी उपयुक्त असणारे हे श्वान संपूर्णत: भारतीय प्रजाती म्हणून ओळखले जाते. कारवान हाऊंड या कुत्र्याच्या प्रजातीचा इतिहास शंभर वर्षे जुना आहे. फार पूर्वीच्या काळात कारवान हाऊंड या प्रजातीचे संदर्भ सापडतात. छत्रपती शाहू महाराज शिकारीसाठी जात तेव्हा त्यांच्यासोबत कारवान हाऊंड असत. त्या काळात शेतकरीही आपल्या शेताच्या तसेच घराच्या राखणदारीसाठी या कुत्र्यांची निवड करत. पूर्वीच्या काळी शिकारीतील मदतनीस आणि राखणदार या दोन कारणांसाठी कारवान हाऊंडला पसंती मिळत असे. अलीकडच्या काळात शिकारीचे प्रमाण नगण्य असल्याने राखणदारीसाठीच या प्रजातीची निवड केली जाते. महाराष्ट्रात बीड, सोलापूर, सांगली, सातारा आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमा या परिसरात कारवान हाऊंड ही प्रजाती जास्त प्रमाणात आढळते.